आम्ही देवाची वाणी कशी ओळखू शकतो?


प्रश्नः आम्ही देवाची वाणी कशी ओळखू शकतो?

उत्तरः
हा प्रश्न अनेक युगांपासून असंख्य लोक विचारीत आहेत. शमुवेलाने देवाची वाणी ऐकली, पण जोवर एलीने त्याला त्याविषयी शिकविले नाही तोवर त्याने ती ओळखली नाही (1 शमुवेल 3:1-10). गिदोनास देवाकडून भौतिक प्रकटीकरण प्राप्त झाले, आणि जे काही त्याने ऐकले होते त्याविषयी त्याला अद्याप इतकी शंका होती की त्याने एकदा नव्हे, तर तीनदा, चिन्ह मागितले (शास्ते 6:17-22, 36-40). जेव्हा आपण देवाची वाणी ऐकू इच्छितो, तेव्हा आपण कसे ओळखू शकतो की बोलणारा तोच आहे? सर्वप्रथम, आमच्याजवळ असे काही आहे जे गिदोनाजवळ आणि शमुवेलाजवळ नव्हते. आमच्याजवळ वाचनासाठी, अभ्यासासाठी, आणि मनन करण्यासाठी पूर्ण बायबल, ईश्वर प्रेरित देवाचे वचन आहे. "प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे, ह्यासाठी की, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा" (तीमथ्यास 2रे पत्र 3:16-17). जेव्हा आमच्याजवळ एखाद्या विषयासंबंधी अथवा आमच्या जीवनांतील निर्णयाविषयी प्रश्न असतो, तेव्हा आम्ही पाहिले पाहिजे की बायबल त्याविषयी काय म्हणते. देवाने त्याच्या वचनात जे शिकविले आहे त्याविरुद्ध तो आम्हास कधीही चुकीच्या मार्गाने नेणार नाही (तीताला पत्र 1:2).

देवाची वाणी ऐकण्यासाठी आम्ही देवाचे असले पाहिजे. येशूने म्हटले, "माझी मेंढरें माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखितो व ती माझ्यामागे येतात" (योहान 10:27). जे देवाची वाणी ऐकतात ते त्याचे आहेत — जे प्रभु येशूठायी विश्वासाद्वारे कृपेने तारण पावले आहेत. हीच मेंढरे आहेत जी त्याची वाणी ऐकतात आणि ओळखतात, कारण ते त्याला त्यांचा मेंढपाळ म्हणून ओळखतात. जर आपणास देवाची वाणी ओळखावयाची असेल, तर आम्ही त्याचे असले पाहिजे.

जेव्हा आम्ही बायबलच्या अभ्यासात आणि त्याच्या वचनाच्या शांत चिंतनात वेळ घालवितो तेव्हा आम्ही त्याची वाणी ऐकतो. जितका सलगीचा वेळ आम्ही देवाबरोबर आणि त्याच्या वचनासोबत घालवू, तितके त्याची वाणी आणि आमच्या जीवनांत त्याचे मार्गदर्शन ओळखणे आम्हास सोपे जाईल. बँकेतील कर्मचार्‍यास खर्या पैश्याचा अभ्यास करण्याद्वारे नकली नोटा ओळखण्यास प्रशिक्षित केले जाते इतके बारकाईने की खोटा पैसा ओळखणे सोपे जाते. आम्ही देवाच्या वचनाशी इतके परिचित असले पाहिजे की जेव्हा कोणी आमच्याशी चुकीचे बोलतो, तेव्हा आम्हास ते स्पष्टपणे कळले पाहिजे की ते देवाकडून नाही.

आज देव लोकांशी ऐकू येईल असे बोलू शकतो, त्याचवेळी तो मुख्यतः आपल्या लिखित वचनाद्वारे बोलतो. कधी कधी देवाचे मार्गदर्शन पवित्र आत्म्याद्वारे, आमच्या विवेकबुद्धीद्वारे, परिस्थितींद्वारे, आणि इतर लोकांच्या प्रोत्साहनांद्वारे प्राप्त होते. जे काही आम्ही ऐकतो त्याची तुलना पवित्र शास्त्राच्या सत्याशी केल्याने, आपण देवाची वाणी ओळखण्यास शिकू शकतो.

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
आम्ही देवाची वाणी कशी ओळखू शकतो?