प्रश्नः
देव आज लोकांस दृष्टांत देतो काय? विश्वासणार्यांनी त्यांच्या ख्रिस्ती अनुभवाचा भाग म्हणून दृष्टातांची अपेक्षा करावी काय?
उत्तरः
देव आज लोकांस दृष्टांत देऊ शकतो काय? होय! देव आज लोकांस दृष्टांत देतो काय? शक्यतः. सामान्य घटना म्हणून आपण दृष्टांतांची अपेक्षा करावी काय? नाही. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे, देव दृष्टांतांच्याद्वारे अनेकदा लोकांशी बोलला. उदाहरणे आहेत योसेफ, याकोबाचा पुत्र; योसेफ, मरियेचा पती; शलमोन; यशया, यहेजकेल, दानिएल, पेत्र, आणि पौल. योएल संदेष्ट्याने दृष्टांतांच्या वर्षावाविषयी भविष्य कथन केले होते, आणि याची पुष्टी प्रेषितांच्या कृत्यांच्या 2 र्या अध्यायात प्रेषित पेत्राने केली होती. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की दृष्टांत आणि स्वप्न यांच्यातील फरक हा आहे की दृष्टांत हा व्यक्तीस जागेपणी देण्यात येतो तर स्वप्न हे व्यक्तीस झोपेत दिले जाते.
जगाच्या अनेक भागांत, देव दृष्टांतांचा आणि स्वप्नांचा व्यापक प्रमाणात उपयोग करीत असल्याचे दिसून येते. जेथे सुवार्तेचा संदेश थोडा किंवा मुळीच उपलब्ध नाही, आणि जेथे लोकांजवळ बायबल नाही, अशा ठिकाणी देव लोकांप्रत त्याचा संदेश प्रत्यक्ष स्वप्न व दृष्टांतांच्या रूपात पोहोचवीत आहे. हे पूर्णपणे बायबलच्या दृष्टांतांच्या उदाहरणाशी सुसंगत आहे ज्यात देवाने ख्रिस्ती विश्वासाच्या प्रारंभीच्या दिवसांत त्याचे सत्य लोकांवर प्रगट करण्यासाठी त्यांचा सतत उपयोग केला. त्याला आवश्यक वाटेल त्या कोणत्याही माध्यमांचा उपयोग तो करू शकतो — मिशनरी, स्वर्गदूत, दृष्टांत, अथवा स्वप्न. अर्थात, देवाजवळ विभिन्न क्षेत्रांत दृष्टांत देण्याची पात्रता आहे जेथे सुवार्तेचा संदेश आधीच सहज उपलब्ध आहे. देव काय करू शकतो यास सीमा नाही.
त्याचवेळी, दृष्टांत आणि त्यांच्या अर्थाची जेव्हा बाब येते तेव्हा आम्ही सावध असले पाहिजे. आम्ही हे लक्षात ठेविले पाहिजे की बायबल पूर्ण झाले आहे, आणि जे जाणून घेण्याची आम्हास गरज आहे ते सर्व ते सांगते. मुख्य सत्य हे आहे की जर देवाला दृष्टांत द्यावयाचा असेल, तर जे काही त्याने आधीच आपल्या वचनात सांगितले आहे त्याच्याशी तो पूर्णपणे सहमत असेल. दृष्टांतांस कधीही देवाच्या वचनाच्या बरोबरीचा अथवा त्यापेक्षा मोठा अधिकार देता कामा नये. आमचा ख्रिस्ती विश्वास आणि आचरण यासाठी देवाचे वचन का आमचा परम अधिकार आहे. जर आपला असा विश्वास आहे की आपण दृष्टांत पाहिला आणि आपणास असे वाटते की कदाचित देवाने तो आपणास दिला असावा, तर आपण प्रार्थनापूर्वक देवाच्या वचनाचे परीक्षण करावे आणि खात्री करून घ्यावी ते पवित्र शास्त्रानुसार आहे. मग आपण प्रार्थनापूर्वक विचार करावा की त्या दृष्टांतास प्रतिसाद म्हणून आपण काय करावे असे देवास वाटत असावे (याकोब 1:5). देव व्यक्तीस दृष्टांत देऊन त्याचा अर्थ गुप्त ठेवणार नाही. पवित्र शास्त्रात, जेव्हाही व्यक्तीने देवास दृष्टांताचा अर्थ विचारला, तेव्हा देवाने याची खात्री करून घेतली की तो व्यक्तीस समजाविण्यात यावा (दानिएल 8:15-17).
English
देव आज लोकांस दृष्टांत देतो काय? विश्वासणार्यांनी त्यांच्या ख्रिस्ती अनुभवाचा भाग म्हणून दृष्टातांची अपेक्षा करावी काय?