प्रश्नः
एकाच गोष्टीसाठी वारंवार प्रार्थना करणे मान्य आहे काय, किंवा आम्ही केवळ एकदाच मागितले पाहिजे काय?
उत्तरः
लूक 18:1-7 मध्ये, येशू प्रार्थनेमध्ये खंबीरपणे टिकून राहण्याचे महत्व समजाविण्यासाठी एका दाखल्याचा उपयोग करतो. तो एका विधवेची गोष्ट सांगतो जी तिच्या शत्रूविरुद्ध न्याय मागण्यासाठी एका अन्यायी न्यायाधीशाजवळ येते. प्रार्थनेत आग्रह केल्यामुळे, न्यायाधीशाचे अंतःकरण पाघळले. येशूला असे म्हणावयाचे आहे की जर एक अन्यायी न्यायाधीश अशा व्यक्तीची विनंती पूर्ण करतो जी चिकाटीने न्यायाचा आग्रह करते, तर आम्हावर — "त्याच्या निवडलेल्या लोकांवर" (वचन 7) प्रीती करणारा देव — आम्ही प्रार्थना करीत राहिल्यास आमच्या प्रार्थनेचे उत्तर किती अधिक देईल? जसे चुकीने समजले जाते, तसा दाखला असे शिकवीत नाही, की जर आपण एखाद्या गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा प्रार्थना करीत राहिलो, तर आम्हास ते देणे देवाला भाग पडते. त्याऐवजी, देव त्याच्या लोकांसाठी सूड उगविण्याचे, त्यांचा बदला घेण्याचे, त्यांच्याशी घडलेला अन्याय दूर करण्याचे, त्यांस न्याय मिळवून देण्याचे, आणि त्यांस त्यांच्या शत्रूपासून सोडविण्याचे अभिवचन देतो. असे तो त्याच्या न्यायपूर्णतेमुळे, त्याच्या पवित्रतेमुळे, आणि पापाचा वीट असल्यामुळे करतो; प्रार्थनेचे उत्तर देत असतांना, तो आपली अभिवचने पूर्ण करतो आणि त्याचे सामर्थ्य प्रकट करतो.
येशू लूक 11:5-12 मध्ये प्रार्थनेचे दूसरे उदाहरण देतो. अन्यायी न्यायाधीशाच्या दाखल्यासारखा, ह्या परिच्छेदात येशूचा संदेश हा आहे की जर मनुष्य आपल्या गरजवंत मित्राची गरज भागविण्यासाठी स्वतःची गैरसोय करून घेईल, तर देव आमच्या गरजा आणखीच मोठ्या प्रमाणात पुरविल, कारण कोणत्याही विनंतीमुळे त्याची गैरसोय होत नाही. येथे पुन्हा, अभिवचन हे नाही की जर आम्ही केवळ मागित राहिलो तर जे काही आम्ही मागू ते आम्हास मिळेल. देवाचे त्याच्या मुलांस अभिवचन हे आहे की तो आमच्या गरजा पूर्ण करण्याचे अभिवचन देतो, आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे नव्हे. आणि तो आमच्यापेक्षा आमच्या गरजांविषयी अधिक चांगल्याप्रकारे जाणतो. ह्याच अभिवचनाची मत्तय 7:7-11 आणि लूक 11:13 या वचनांत पुनरावृत्ती करण्यात आली आहे, जेथे "उत्तम देणगी" म्हणजे पवित्र आत्मा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे दोन्ही परिच्छेद आम्हाला प्रार्थना करावयास आणि प्रार्थना करीत राहावयास प्रोत्साहन देतात. एकाच गोष्टीसाठी वारंवार मागण्यात काहीही चुकीचे नाही. जोवर जे काही आम्ही मागतो ते देवाच्या इच्छेअंतर्गत असेल (योहानाचे 1 ले पत्र 5:14-15), तोवर जोपर्यंत देव आपल्या प्रार्थनेचे उत्तर देत नाही अथवा त्याविषयीची इच्छा आपल्या अंतःकरणातून दूर करीत नाही तोपर्यंत प्रार्थना करीत राहावे. कधी कधी देव आम्हास धैर्य आणि चिकाटी शिकविण्यासाठी आमच्या प्रार्थनांच्या उत्तरांची वाट पाहण्यास आम्हास भाग पाडतो. कधी कधी आम्ही अशी गोष्ट मागतो जेव्हा ती आम्हास देणे आमच्यासाठी देवाच्या वेळापत्रकात अद्याप नसते. कधी कधी आम्ही अशी गोष्ट मागतो जी आमच्यासाठी देवाची इच्छा नसते, आणि तो "नाही" म्हणतो. प्रार्थना केवळ आमच्या विनंत्या देवापुढे सादर करणे नव्हे; तर देवाचे त्याची इच्छा आमच्या अंतःकरणास सादर करणे होय. जोवर देव आपल्या विनंतीचे उत्तर देत नाही अथवा आपणास हे पटवीत नाही की आपली विनंती आपल्यासाठी त्याची इच्छा नाही, तोवर मागत राहा, ठोठावत राहा, आणि शोधत राहा.
English
एकाच गोष्टीसाठी वारंवार प्रार्थना करणे मान्य आहे काय, किंवा आम्ही केवळ एकदाच मागितले पाहिजे काय?