settings icon
share icon
प्रश्नः

मुलांना त्यांच्या पालकांच्या पापाबद्दल शिक्षा होते काय?

उत्तरः


मुलांना त्यांच्या पालकांनी केलेल्या पापाबद्दल शिक्षा होत नाही; ना पालकांना त्यांच्या मुलांच्या पापाबद्दल शिक्षा होते. आपल्यामधील प्रत्येकजण हा स्वतःच्या पापासाठी जबाबदार आहे. यहेज्केल 18:20 आपल्याला सांगते, “जो जिवात्मा पाप करील तोच मरेल; मुलगा बापाच्या पातकाचा भार वाहणार नाही, आणि बाप मुलग्याच्या पातकाचा भार वाहणार नाही.” हे वचन स्पष्टपणे हे दाखवते की, एखाद्या व्यक्तीच्या पापाची शिक्षा ही त्याच व्यक्तीने भोगली पाहिजे.

एक वचन असे आहे ज्याने काहींना यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले आहे की, पवित्र शास्त्र पापासाठी पिढ्यानपिढ्या शिक्षा देण्याची शिकवण देते, परंतु हा अर्थ चुकीचा आहे. वरील प्रश्नातील वचन हे निर्गम 20:5 आहे, जे मूर्तीच्या संदर्भात सांगितले गेले आहे, “त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको; करण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करितात त्यांच्या मुलांना तिसऱ्याचौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल शासन करितो.” हे वचन शिक्षेबद्दल फारसे काही बोलत नाही, पण ते परिणामांबद्दल बोलते. हे असे सांगते की एखाद्या मनुष्याच्या पापाचे परिणाम पिढीनंतर सुद्धा जाणवू शकतात. देव इस्राएली लोकांना सांगत होता की, त्यांच्या मुलांना त्यांच्या वडिलांनी देवाची केलेली अवज्ञा आणि घृणा यांचा स्वाभाविक परिणाम म्हणून वडिलांच्या पिढीचा प्रभाव जाणवू शकतो. अशा वातावरणात वाढलेली मुले त्याच प्रकारच्या मुर्तीपुजेच्या प्रथांमध्ये अडकतात, आणि अशा प्रकारे, अवज्ञेच्या स्थापित झालेल्या नमुन्यामध्ये सापडतात. अवज्ञा करणाऱ्या पिढीचा प्रभाव हा दुष्टतेला खोलवर असा रुजवतो की तो पुन्हा काढून टाकण्यासाठी अनेक पिढ्या जातात. देव आपल्या पालकांच्या पापाबद्दल आपल्याला जबाबदार धरत नाही, परंतु जसे निर्गम 20:5 सांगते तसे आपल्याला काहीवेळेस आपल्या पालकांनी केलेल्या पापांचा परिणाम म्हणून त्रास सहन करावा लागू शकतो.

यहेज्केल 18:20 मध्ये दाखवल्याप्रमाणे, आपल्यातील प्रत्येकाला त्याच्या स्वतःच्या पापासाठी जबाबदार धरले जाईल आणि आपल्याला त्यासाठी शिक्षा भोगावी लागेल. आपण आपला दोष दुसऱ्याबरोबर वाटून घेऊ शकत नाही, किंवा दुसऱ्याला त्याबद्दल जबाबदार धरू शकत नाही. तथापि, तेथे या नियमासाठी एक अपवाद आहे, आणि तो सर्व मानवजातीसाठी लागू आहे. एका मनुष्याने दुसऱ्यांच्या पापाला धारण केले आणि त्यांच्यासाठी दंडाची परतफेड केली, जेणेकरून पापी लोक देवाच्या दृष्टीमध्ये पूर्णपणे शुद्ध आणि नीतिमान होतील. तो मनुष्य येशू ख्रिस्त आहे. आमच्या पापांसाठी त्याच्या परिपूर्णतेची देवाण घेवाण करण्यासाठी देवाने येशूला जगामध्ये पाठवले. “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरिता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नितीमात्व असे व्हावे” (2 करिंथ 5:21). जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेऊन त्याच्याकडे येतात तो त्यांच्यापासून त्यांच्या पापांच्या शिक्षेला दूर करतो.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मुलांना त्यांच्या पालकांच्या पापाबद्दल शिक्षा होते काय?
© Copyright Got Questions Ministries