साथीच्या रोगांबद्दल बायबल काय म्हणते?


प्रश्नः साथीच्या रोगांबद्दल बायबल काय म्हणते?

उत्तरः
इबोला किंवा कोरोना व्हायरससारख्या साथीच्या रोगांच्या वेगवेगळ्या उद्रेकांमुळे अनेकांस हे विचारावयास प्रेरित केले आहे की देव साथीच्या रोगांची परवानगी का देतो - अशा रोगराईंस कारणीभूत का ठरतो - हे आजार शेवटच्या काळाचे चिन्ह आहे काय? बायबलमध्ये, विशेषेकरून जुन्या करारात, देव अनेक प्रसंगांचे वर्णन करतो जेव्हा देवाने “मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून“ त्याच्या लोकांवर आणि त्याच्या शत्रूंवर पीडा आणि रोग आणले (निर्गम 9:14,16). इस्राएल लोकांस गुलामगिरीतून मुक्त करण्यास फारोस भाग पाडण्यासाठी त्याने मिसर देशाविरुद्ध पीडा आणल्या आणि त्याचवेळी आपल्या लोकांस या पीडांपासून प्रभावित होण्यापासून वाचविले (निर्गम 12:13; 15:26), यावरून असे दिसून येते की रोगराईंवर आणि इतर पीडांवर त्याचे सार्वभौम नियंत्रण आहे.

देवाने त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याच्या दुष्परिणामांविषयी, ज्यात पीडांचाही समावेश आहे, आपल्या लोकांस ताकीद दिली (लेवीय 26:21,25). दोन प्रसंगी, देवाने आज्ञा मोडण्याच्या विविध कृत्यांसाठी 14,700 लोकांचा आणि 24,000 लोकांचा नाश केला (गणना 16:49 आणि 25:9). मोशेचे नियमशास्त्र दिल्यानंतर, देवाने लोकांना आज्ञा पाळण्याची आज्ञा दिली अथवा त्यांना अनेक दुःख सहन करावे लागतील असे सुचविले, ज्यात इबोलासारख्या काही गोष्टींचा समावेश आहे: “क्षयरोग, ताप, दाह, जळजळ.... ह्याच्यायोगे परमेश्वर तुला मारील आणि तू नाश पावेपर्यंत ही तुझा पिच्छा पुरवितील“ (अनुवाद 28:22). देवाने उत्पन्न केलेल्या अनेक पीडांची व रोगांची ही अगदी काही उदाहरणे आहेत.

कधीकधी ही कल्पना करणे कठीण वाटते की आपल्या प्रेमळ व दयाळू परमेश्वराने आपल्या लोकांवर असा प्रकोप व क्रोध प्रकट करावा. परंतु देवाच्या शिक्षेचे ध्येय नेहमीच पश्चात्ताप आणि पुनर्स्थापन असते. 2 इतिहास 7:13-14 मध्ये देव शलमोनास म्हणाला, “पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाशकपाटे बंद केली, किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठवली, किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली, तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गांपासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन.” आपल्या लोकांस स्वतःकडे आणण्यासाठी, पश्चाताप घडवून आणण्यासाठी आणि आपल्या स्वर्गीय पित्याची मुले म्हणून त्यांनी त्याजकडे येण्याची इच्छा धरावी म्हणून येथे आपण देवास विपत्तीचा उपयोग करतांना पाहतो.

नव्या करारात, येशूने “प्रत्येक रोग व आजार” तसेच त्याने भेट दिलेल्या क्षेत्रातील प्रत्येक पीडा बरी केली (मत्तय 9:35;10:1; मार्क 3:10). ज्याप्रमाणे देवाने इस्राएली लोकांवर आपले सामर्थ्य प्रकट करण्यासाठी पीडांचा आणि रोगांचा उपयोग करण्याची निवड केली, त्याचप्रमाणे येशूने तो खरोखर देवाचा पुत्र आहे हे सत्यापित करण्यासाठी त्याच सामर्थ्र्याचे प्रदर्शन म्हणून लोकांस बरे केले. त्याने हेच आरोग्यदानाचे सामर्थ्य त्याच्या शिष्यांस त्यांच्या सेवेची पडताळणी करण्यासाठी दिले (लूक 9:1). देव आजही त्याच्या स्वतःच्या हेतूपूर्तीसाठी रोगांची परवानगी देतो, परंतु कधीकधी रोग, जागतिक साथीचे रोग, पतीत जगात राहण्याचा परिणाम असतात. एखाद्या रोगाच्या साथीमागे विशिष्ट आध्यात्मिक कारण आहे किंवा नाही हे ठरविण्याचा कोणताही मार्ग नाही, परंतु आपणास हे ठाऊक आहे की सर्व गोष्टींवर देवाचे सार्वभौम नियंत्रण आहे (रोमकरांस पत्र 11:36), परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणाऱ्याना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात (रोमकरांस पत्र 8:28).

इबोला आणि कोरोना व्हायरससारख्या रोगांचा प्रादुर्भाव येणारया संक्रामक रोगांची वानगी आहे जे शेवटच्या काळाचा भाग असतील. येशूने शेवटल्या दिवसांशी संबंधित भविष्यातील पीडांचा उल्लेख केला (लूक 21:11). प्रकटीकरण 11 च्या दोन साक्षीदारांस “वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पीडांनी पीडित करण्याचाही अधिकार आहे” (प्रकटीकरण 11:6). सात देवदूत शेवटचा, कठोर दंड म्हणून प्रकटीकरण 16 मध्ये वर्णन करण्यात आलेल्या सात पीडा पाठवितील.

साथीच्या रोगांच्या प्रादुर्भावाचा संबंध पापाविषयी देवाच्या विशिष्ट दंडाशी जोडता येऊ शकतो अथवा नाही. तो केवळ पतीत जगात राहण्याचा परिणाम देखील असू शकतो. येशूच्या परत येण्याचा समय कोणासही ठाऊक नाही म्हणून आपण असे म्हणण्याविषयी सावध असले पाहिजे की रोगाची जागतिक साथ या गोष्टीचा पुरावा आहे की आपण शेवटच्या काळांत जगत आहोत. जे लोक येशू ख्रिस्तास आपला तारणारा म्हणून जाणत नाहीत, त्यांच्यासाठी रोग या गोष्टीची आठवण करून देणारे ठरावे की पृथ्वीवरील जीवन हे क्षणभंगूर आहे आणि ते कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते. हे साथीचे रोग कितीही वाईट का असेनात, नरक त्यापेक्षाही वाईट असेल. परंतु ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर वाहिलेल्या रक्तामुळे ख्रिस्ती विश्वासणाऱ्याजवळ तारणाचे आश्वासन आणि सार्वकालिक जीवनाची आशा आहे (यशया 53:5; 2 करिंथकरांस पत्र 5:21; इब्री लोकांस पत्र 9:28).

ख्रिस्ती लोकांनी साथीच्या रोगांस कसा प्रतिसाद दिला पाहिजे? सर्वप्रथम, घाबरू नका. सर्व गोष्टींवर देवाचे नियंत्रण आहे. बायबल 300 पेक्षा जास्त वेळा “भयभीत होऊ नका” या अर्थाचे वचन देते. दुसरी गोष्ट, शहाणे व्हा. रोग टाळण्यासाठी योग्य ती पावले उचला आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण आणि पालनपोषण करा. तिसरे म्हणजे, सेवेची संधी शोधा. बरेचदा जेव्हा लोकांस त्यांच्या जीवाची भीती असते, तेव्हा ते सार्वकालिक जीवनाविषयी बोलण्यासाठी अधिक इच्छुक असतात. सुवार्ता सांगत असतांना धैर्याने आणि प्रेमळपणे वागा, प्रीतीने सत्य बोला (इफिसकरांस पत्र 4:15).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
साथीच्या रोगांबद्दल बायबल काय म्हणते?