settings icon
share icon
प्रश्नः

मी खोट्या शिक्षकांस/खोट्या संदेष्ट्यांस कसे ओळखू शकतो?

उत्तरः


येशूने आम्हास सावध केले की "खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्ट्ये" उठतील व साधेल तर निवडलेल्यांस देखील फसविण्याचा प्रयत्न करतील (मत्तय 24:23-27; पाहा पेत्राचे 2 रे पत्र 3:3 आणि यहूदाचे पत्र 17-18). खोट्या शिकवणीपासून आणि खोट्या शिक्षकांपासून स्वतःचे रक्षण करण्याची उत्तम पद्धत म्हणजे सत्य जाणणे. नकली ओळखण्यासाठी, खर्या गोष्टींचा अभ्यास करावा. जो विश्वासणारा "सत्याचे वचन नीट सांगणारा" (तीमथ्याला 2 रे पत्र 2:15) असेल आणि जो बायबलचा विचारपूर्वक अभ्यास करतो तो खोटी शिकवण ओळखू शकतो. उदाहरणार्थ, ज्या विश्वासणार्याने मत्तय 3:16-17 या वचनांत पिता, पुत्र, आणि पवित्र आत्मा यांच्या कार्याविषयी वाचले आहे तो त्रिएक परमेश्वराचा नाकार करणार्या कोणत्याही सिद्धांतासंबंधाने लगेच प्रश्न करू शकेल. म्हणून, पहिले पाऊल आहे बायबलचा अभ्यास करणे आणि पवित्र शास्त्र जे काही म्हणते त्याद्वारे सर्व शिकवणींचे परीक्षण करणे.

येशूने म्हटले, "फळांवरून झाड कळते" (मत्तय 12:33). "फळ" शोधण्यासाठी, येथे तीन विशिष्ट चाचण्या दिलेल्या आहेत ज्या कोणत्याही शिक्षकाच्या शिकवणीची यथार्थता ठरविण्यासाठी त्याला लागू करता येतील.

1) हा शिक्षक येशूविषयी काय म्हणतो? मत्तय 16:15-16 मध्ये येशूने विचारले, "तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?" शिमोन पेत्राने उत्तर दिले, "आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा," आणि ह्या उत्तरासाठी पेत्राला "धन्य" म्हटले गेले. योहानाचे 2 रे पत्र 9 मध्ये, आम्ही वाचतो, "खिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही; जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे." दुसर्या शब्दात, येशू ख्रिस्त आणि तारणाचे त्याचे कार्य अत्यंत महत्वाचे आहे; अशा कोणत्याही व्यक्तीपासून सावध असा जो या गोष्टीचा नाकार करतो की येशू देवाच्या बरोबरीचा आहे, जो येशूच्या बलिदानात्मक मृत्यूस कमी लेखितो, अथवा जो येशूच्या मानवतेचा नाकार करतो. योहानाचे 1 ले पत्र 2:22 म्हणते, "कोण लबाड आहे? येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारितो तो. असा व्यक्ती ख्रिस्तविरोधी आहे — जो पित्याला व पुत्राला नाकारितो."

2) हा शिक्षक सुवार्ता प्रसार करतो काय? सुवार्तेची व्याख्या पवित्र शास्त्रानुसार, येशूचा मृत्यू, पुरले जाणे, आणि पुनरुत्थान याविषयीची आनंदाची वार्ता अशी करण्यात येते (करिंथकरांस 1 ले पत्र 15:1-4). "देव आपणावर प्रीती करतो," "देवाची इच्छा आहे की आम्ही भुकेल्यांस अन्न द्यावे," आणि "आपण सम्पन्न असावे अशी देवाची इच्छा आहे" ही वाक्ये कितीही चांगली वाटत असली, तरीही, सुवार्तेचा पूर्ण संदेश नाहीत. जसे पौलाने गलतीकरांस पत्र 1:7 मध्ये ताकीद दिली, "तुम्हास घोटाळ्यांत पाडणारे व ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करू पाहणारे असे कित्येक आहेत." देवाने आम्हास दिलेला संदेश बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही, मोठ्या सुवार्तिकासही नाही. "जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हास सांगितल्यास, तो श्रापभ्रष्ट असो" (गलतीकरांस पत्र 1:9).

3) हा शिक्षक प्रभूला गौरविणारे चारित्र्यगुण दाखवितो काय? खोट्या शिक्षकांविषयी बोलतांना, यहूदा 11 हे वचन म्हणते, "ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांति मार्गात बेफामपणे घुसले, आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला." दुसर्या शब्दांत, खोट्या शिक्षकांस त्यांच्या अहंकारामुळे (काइनाने देवाच्या योजनेचा अव्हेर केला), लोभ (बलामाने पैश्यासाठी संदेश दिला), आणि बंड (कोरहाने स्वतःला मोशेपेक्षा पुढे वाढविण्याचा प्रयत्न केला) ओळखता येते. येशूने म्हटले की अशा लोकांपासून सावध असावे आणि आपण त्यांस त्यांच्या फळांवरून ओळखू (मत्तय 7:15-20).

पुढील अभ्यासासाठी, बायबलच्या अशा पुस्तकांचे सिंहावलोकन करा जी मंडळीतील खोट्या शिकवणींस तोंड देण्यासाठी लिहिण्यात आलेली होती: गलतीकरांस पत्र, पेत्राचे 2 रे पत्र, योहानाचे 1 ले पत्र, योहानाचे 2 रे पत्र, आणि यहूदाचे पत्र. खोट्या शिक्षकास/खोट्या संदेष्ट्यास ओळखणे कित्येकदा कठीण जाते. सैतान प्रकाशाचा दूत म्हणून बतावणी करीत असतो (करिंथकरांस 2 पत्र 11:14), आणि त्याचे सेवक नीतिमत्वाचे दास म्हणून बतावणी करीत असतात (करिंथकरांस 2 पत्र 11:15). केवळ सत्याशी पूर्णपणे अवगत असण्याद्वारेच आपण नकली ओळखू शकू.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

मी खोट्या शिक्षकांस/खोट्या संदेष्ट्यांस कसे ओळखू शकतो?
© Copyright Got Questions Ministries