settings icon
share icon
प्रश्नः

दैहिक ख्रिस्ती म्हणजे काय?

उत्तरः


खरा ख्रिस्ती दैहिक असू शकतो काय? या प्रश्नाचे उत्तर देताना, अगोदर “दैहिक” या शब्दाला परिभाषित करूया. “दैहिक” हा शब्द सर्कीकोस या ग्रीक शब्दापासून भाषांतरित करण्यात आला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ “शारीरिक वासनेसंबंधीचा” असा होतो. आपल्याला ख्रिस्ती लोकांच्या संदर्भात या शब्दाचे चांगल्या प्रकारे वर्णन 1 करिंथकरांस पत्र 3:1-3 मध्ये पहावयास मिळते, प्रेषित पौल वाचकांना “बंधुंनो” म्हणून संबोधतो, या संज्ञेला तो बहुधा केवळ इतर ख्रिस्ती लोकांना संदर्भित करण्यासाठी वापरतो; नंतर तो त्यांचे वर्णन “दैहिक” म्हणून करतो. म्हणून, आपण असा निष्कर्ष काढू शकतो की ख्रिस्ती लोक दैहिक असू शकतात. पवित्र शास्त्र पूर्णपणे स्पष्ट करते की कोणीही पापविरहित नाही (1 योहान 1:8). प्रत्येक वेळी जेंव्हा आपण पाप करतो, त्या वेळी आपण दैहिक असल्याप्रमाणे वागतो.

समजून घेण्याची मुख्य गोष्ट अशी आहे की, एक ख्रिस्ती, काही वेळासाठी, दैहिक असू शकतो, पण एक खरा ख्रिस्ती आयुष्यभरासाठी दैहिक राहू शकत नाही. काही लोकांनी “दैहिक ख्रिस्ती” या कल्पनेचा हे सांगून गैरवापर केला आहे की, काही लोकांसाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवून उरलेले त्यांचे संपूर्ण आयुष्य पूर्णपणे दैहिक पद्धतीने व्यतीत करणे हे शक्य आहे, ज्या मध्ये नवीन जन्म झालेला किंवा नवीन सृष्टी असलेल्याचा कोणताही पुरावा नाही (2 करिंथकरांस पत्र 5:17). अशी संकल्पना ही पूर्णपणे पवित्र शास्त्राच्या विरोधामध्ये आहे. याकोबाचे पत्र 2 हे विपुलतेने स्पष्ट करते की, खऱ्या विश्वासाचा परिणाम नेहमीच चांगले कार्य असते. इफिसकरांस पत्र 2:8-10 हे सांगते की, जरी आपले तारण केवळ कृपेच्या आणि विश्वासाच्या द्वारे झालेले आहे, तरी त्या तारणाचा परिणाम चांगल्या कार्याच्या रुपात दिसतो. एखादा ख्रिस्ती अपयशाच्या आणि/किंवा बंडखोरीच्या काळात, दैहिक भासू शकतो काय? याचे उत्तर होय असे आहे. खरा ख्रिस्ती नेहमी दैहिक राहू शकतो? याचे उत्तर नाही असे आहे.

ज्याअर्थी सार्वकालिक सुरक्षितता हे वचनांची वस्तुस्थिती आहे, म्हणून दैहिक ख्रिस्ती सुद्धा अद्याप तारलेले आहेत. तारण गमावले जाऊ शकत नाही, कारण तारण हे देवाची देणगी आहे ज्याला तो काढून घेत नाही (पहा योहान 10:28; रोमकरांस पत्र 8:37-39; 1 योहान 5:13). 1 करिंथकरांस पत्र 3:15 मध्ये सुद्धा दैहिक ख्रिस्ती लोकांच्या तारणाची खात्री दिलेली आहे: “ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल, तथापि तो स्वतः तारला जाईल; परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.” प्रश्न हा नाही कि, एक व्यक्ती जो ख्रिस्ती होण्याचा दावा करतो परंतु दैहिकरीत्या जीवन जगतो त्याने तारण गमावले आहे, परंतु हा आहे की आधी त्या व्यक्तीचे खरोखर तारण झालेले आहे काय (1 योहान 2:19).

जे ख्रिस्ती त्यांच्या स्वभावात दैहिक बनतात ते अशी अपेक्षा करू शकतात की, देव त्यांना प्रेमळपणे शिस्त लावेल (इब्रीकरांस पत्र 12:5-11) जेणेकरून त्यांचे देवाशी अधिक जवळपणे सहभागीता करण्यासाठी आणि त्याच्या आज्ञांचे पालन करण्यासाठी पुनर्संचयन करता येईल. आपल्याला वाचवण्यामध्ये देवाची इच्छा ही आहे की आपण क्रमाक्रमाने ख्रिस्ताच्या प्रतीरुपात रुपांतरीत होत जावे (रोमकरांस पत्र 12:1-2), अत्मिकतेमध्ये वाढत जावे आणि दैहीकतेमध्ये कमी होत जाण्याच्या प्रक्रियेला पवित्रीकरण असे म्हणतात. जोपर्यंत आपली पापमय शरीरामधून सुटका होत नाही, तोपर्यंत दैहीकतेचा उद्रेक होत राहील. ख्रिस्तावर खरा विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी, दैहिकतेचे उद्रेक हे निर्बंध नसून अपवाद असतील.

English



मराठीच्या पहिल्या पानावर वापस या

दैहिक ख्रिस्ती म्हणजे काय?
© Copyright Got Questions Ministries