settings icon
share icon
प्रश्नः

नेफिलीम कोण/काय होते?

उत्तरः


नेफिलीम (”पतीत दूत, महाकाय”) उत्पत्ति 6:1-4 मधील देवपुत्र आणि मानवकन्या यांच्यातील यौन संबंधामुळे उत्पन्न झालेली संतती होते. ”देवाचे पुत्र” कोण आहेत या विषयी बराच वाद आहे. आमचे मत असे आहे की ”देवाचे पुत्र” पतीत दूत (दुरात्मे) होते ज्यांनी मानव स्त्रियांसोबत सहवास केला किंवा मानव पुरुषांस झपाटले ज्यांनी मानव स्त्रियांसोबत संभोग केला. या मिलनाचा परिणाम संतती, नेफिलीम उत्पन्न झाले, जे “प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष” होऊन गेले (उत्पत्ति 6:4).

दुरात्मे असे का करतील? बायबल आपल्याला याचे विशिष्ट उत्तर देत नाही. दुरात्मे दुष्ट, विकृत प्राणी आहेत - म्हणून त्यांनी जे काही केले त्याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये. स्पष्ट प्रेरणा म्हणून, एक अटकळ अशी आहे की मशीहास येण्यापासून रोखण्यासाठी दुरात्मे मानवी रक्तपेढीला दूषित करण्याचा प्रयत्न करीत होते. देवाने असे वचन दिले होते की मशीहा किंवा ख्रिस्त एके दिवशी सर्पाचे, म्हणजे सैतानाचे डोके चिरडेल (उत्पत्ति 3:15). उत्पत्ति 6 मधील दुरात्मे शक्यतो सर्पास चिरडण्यापासून रोखण्याचा आणि पापरहित “स्त्रीच्या संततीचे” जन्म घेणे अशक्य करण्याचा प्रयत्न करीत होते. पुन्हा, हे बायबलचे विशिष्ट उत्तर नाही, परंतु ते बायबलदृष्ट्या वाजवी आहे.

नेफिलीम काय होते? इब्री आणि इतर पौराणिक कथांनुसार (हनोख आणि बायबलमध्ये नसलेली इतर लिखाणे), ते राक्षस आणि महानायकांचे वंश होते ज्यांनी महान कृत्ये केली. त्यांचे अवाढव्य आकार आणि सामथ्र्य दुरात्म्यांचे ”डीएनए” आणि मानवीय जीनांच्या संयोगाने मिळाले. रसेल क्रो अभिनीत नोहा या चित्रपटाच्या अनुसार, नेफिलीम खडकांत लपून बसलेले पतीत दूत होते. बायबल त्यांच्याबद्दल जे काही सांगते ते म्हणजे ते “प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष” होते (उत्पत्ति 6:4). नेफिलीम हे एलियन्स, देवदूत, “पहारेकरी” किंवा खडकतील राक्षस नव्हते; ते शाब्दिक, शारीरिक प्राणी होते आणि ते देवाच्या पुत्राच्या आणि मानवकन्यांच्या एकत्रीकरणापासून उत्पन्न झाले होते (उत्पत्ति 6:1-4).

नेफिलीमचे काय झाले? नोहाच्या काळात झालेल्या महाप्रलयाचे मुख्य कारण म्हणजे नेफिलीम. नेफिलीमच्या उल्लेखानंतर लगेचच, देवाचे वचन सांगते, “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनात येणार्‍या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले; म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, “मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावरून नष्ट करीन; मानव, पशू, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन; कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे” (उत्पत्ति 6:5-7). नोहा, त्याचे कुटुंब आणि तारवातले सर्व प्राणी सोडून देवाने सर्व पृथ्वीवर जलप्रलय पाठवला. नेफिलीमसह (उत्पत्ति 6:11-22) सर्व काही नष्ट झाले.

जलप्रलयानंतर नेफिलीम होते का? उत्पत्ति 6:4 आपल्याला सांगते की, “त्या काळी भूतलावर महाकाय होते - आणि नंतरही.” असे दिसते की जलप्रलयानंतरही दुरात्म्यांनी त्यांच्या पापाची पुनरावृत्ती केली. तथापि, हे बहुधा जलप्रलयाच्या अगोदरच्या तुलनेत खूपच कमी प्रमाणात झाले. जेव्हा इस्राएली लोकांनी कनान देशाची हेरगिरी केली, तेव्हा त्यांनी मोशेला येऊन सांगितले: “तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज (अनाकचे वंशज नेफिलीमहून आले आहेत) आम्ही पाहिले; त्यांच्यापुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळांसारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो” (गणना 13:33). या परिच्छेदात नेफिलीम खरोखर तेथे असल्याचे सांगत नाही, फक्त हेरांना वाटले की त्यांनी नेफिलीम पाहिले. बहुधा हेरांनी कनान देशात बरीच मोठी माणसे पाहिलीत आहेत आणि त्यांच्या भीतीमुळे ते नेफिलीम आहेत असा त्यांचा विश्वास झाला. किंवा हे शक्य आहे की जलप्रलयानंतर दुरात्म्यांनी पुन्हा मानवी स्त्रियांबरोबर संभोग केला आणि आणखी नेफिलीम उत्पन्न झाले. हे देखील शक्य आहे की नेफिलीमची काही वैशिष्ट्ये नोहाच्या एका सूनेच्या वंशातून आली असावीत. काहीही असो, हे ”महाकाय” इस्राएल लोकांद्वारे कनानच्या आक्रमणांदरम्यान (यहोशवा 11:21-22) आणि नंतर त्यांच्या इतिहासात नष्ट नष्ट करण्यात आले (अनुवाद 3:11; १ शमुवेल 17).

आज दुरात्म्यांना अधिक नेफिलीम तयार करण्यास कोणती गोष्ट प्रतिबंधित करते? असे दिसते की देवाने अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या सर्व दुरात्म्यांस एकांतात ठेवून दुरात्म्यांच्या मानवासोबत संभोग करण्याचा शेवट केला. यहूदाच्या 6 व्या वचनात सांगितले आहे की, ”आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांना त्याने निरंतरच्या बंधनात, निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरता राखून ठेवले.” अर्थात, सर्व दुरात्मे आज “बंधनात” नाहीत, म्हणून दुरात्म्यांचा एक गट असा असावा, ज्यांनी मूळ पतनानंतरही आणखी गंभीर पाप केले. अनुमानतः, मानवी स्त्रियांबरोबर संभोग करणार्‍या दुरात्म्यांना “निरंतरच्या बंधनात” राखून ठेवण्यात आले आहे. हे यापुढे कोणत्याही दुरात्म्यांना अशा पापाचा प्रयत्न करण्यापासून यामुळे आळा घालते.

Englishमराठीच्या पहिल्या पानावर वापस या

नेफिलीम कोण/काय होते?
© Copyright Got Questions Ministries