144,000 कोण आहेत?


प्रश्नः 144,000 कोण आहेत?

उत्तरः
144,000 चा उल्लेख प्रथम प्रकटीकरण 7:4 मध्ये आला आहे, “ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशांपैकी एक लक्ष चव्वेचाळीस हजारांवर शिक्का मारण्यात आला.” हा परिच्छेद महाक्लेश काळाच्या सहावा शिक्याचा दंड (प्रकटी 6:12-17) आणि सातवा शिक्का (प्रकटी 8:1) उघडण्यादरम्यान येतो.

“144,000 कोण आहेत?” या प्रश्नाचे उत्तर आम्ही कसे देतो हे यावर अवलंबून आहे की आम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अर्थ लावण्यासाठी कोणत्या पद्धतीचा उपयोग करतो. फ्यूचरिस्टिक पद्धत किंवा भविष्यासंबंधी पद्धत, जी आम्हास सर्वोत्तम वाटते, 144,000 चा अक्षरशः अर्थ लावते. जेव्हा आपण हे जसेच्या तसे घेतो, तेव्हा असे वाटते की प्रकटीकरण 7:4 अंतकाळच्या संकटसमयी जगणार्‍या वास्तविक 144,000 विषयी बोलत आहे. 5-8 वचनांनुसार ही यहूद्यांची निश्चित संख्या असल्याचे या उतार्‍यावरून कळून येते - इस्त्राएलाच्या प्रत्येक गोत्रातून घेतलेले 12,000, याशिवाय दुसरा कुठलाच अर्थ हा उतारा दर्शवित नाही.

या 144,000 यहूदी लोकांवर “शिक्का मारण्यात आला”, ज्याचा अर्थ हा की त्यांना देवाचे विशेष संरक्षण आहे. त्यांना ईश्वरीय न्यायदंडापासून आणि ख्रिस्तविरोधकाच्या क्रोधापासून सुरक्षित राखण्यात आले आहे. ते संकटकाळात आपले सेवाकार्य स्वतंत्रपणे करू शकतात. पूर्वी असे भाकीत करण्यात आले होते की इस्त्राएल पश्चाताप करेल आणि देवाकडे परत फिरेल (जखर्‍या 12:10; रोम 11:25-27), आणि 144,000 यहूदी त्या मुक्ति पावलेल्या इस्त्राएली लोकांचे एक प्रकारचे “प्रथम फळ” असल्यासारखे वाटते (प्रकटी 14:4). त्यांचे सेवाकार्य मंडळीच्या उचलल्या जाण्यानंतर जगास सुवार्ता सांगणे आणि संकटकाळात शुभवर्तमानाची घोषणा करणे आहे असे दिसते. त्यांच्या सेवेचा परिणाम म्हणून, लक्षावधी लोक - “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असे” (प्रकटी 7:9) - ख्रिस्तावर विश्वास करू लागतील.

144,000 संबंधी बराच गोंधळ यहोवाचे साक्षी या पंथाच्या खोट्या शिकवणीचा परिणाम आहे. यहोवाचे साक्षी असा दावा करतात की 144,000 त्या लोकांची मर्यादित संख्या आहे जे स्वर्गात ख्रिस्तासोबत राज्य करतील आणि आपला अनंतकाळ देवाबरोबर घालतील. यहोवाचे साक्षी यांच्या मतानुसार 144,000 लोकांजवळ “स्वर्गीय आशा” आहे. जे या 144,000 मध्ये नाहीत ते ख्रिस्ताद्वारे आणि 144,000 द्वारे शासित पृथ्वीवरील सुखलोकाचा - ज्यास ते “पार्थिव आशा” म्हणतात, आनंद घेतील. हे खरे आहे की ख्रिस्तासोबत हजार वर्षांच्या काळात काही लोक राज्य करतील. यात मंडळीचा (येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारे, 1 करिंथ 6:2), जुन्या कराराचे संत (ख्रिस्ताच्या प्रथम आगमनापूर्वी मेलेले विश्वासणारे, दानीएल 7:27), आणि महासंकटकाळातील संत (जे महासंकटकाळात ख्रिस्ताचा स्वीकार करतात, प्रकटी 20:4) यांचा समावेश आहे. तरीही, बायबल लोकांच्या या समूहावर कुठलीही संख्यात्मक मर्यादा लावत नाही. याशिवाय, हजार वर्षांचे राज्य सनातन अवस्थेपेक्षा वेगळे आहे, जे हजार वर्षांचा अवधि पूर्ण झाल्यावर स्थापित होईल. त्या वेळी, परमेश्वर नवीन यरुशलेमात आमच्यासोबत वस्ती करील. तो आमचा परमेश्वर होईल, आणि आम्ही त्याचे लोक होऊ (प्रकटी 21:3). ख्रिस्तामध्ये आम्हास ज्या वारश्याचे अभिवचन देण्यात आले आहे आणि जो वारसा पवित्र आत्म्याद्वारे शिक्का मोर्तब करण्यात आला आहे (इफिस 1:13-14) आमचा होईल, आणि आम्ही ख्रिस्ताच्या सोबतीचे वारस बनू (रोम 8:17).

English
मराठीच्या पहिल्या पानावर वापस या
144,000 कोण आहेत?